दिनांक 24/8/2026 रोजी श्रीयुत जोशी हे आपली आई हरवली आहे, सापडेल का? याचा शोध घेण्यासाठी माझ्याकडे आले होते. त्यांची आई दि. २०/८/२०२६ रोजी सायंकाळी साधारण ६ च्या सुमारानंतर सापडेनाशी झाली. श्री. जोशी यांच्या म्हणण्यानुसार त्यांची आई ही सकाळी स्वतःचे सर्व आवरून नेहमीप्रमाणे बाहेर पडल्या. त्यांच्या नातेवाईकांकडे गेल्या. नंतर मुलाशी फोनवर देखील बोलल्या होत्या.
जेव्हा त्या संध्याकाळपर्यंत घरी आल्या नव्हत्या तेव्हा त्यांच्या मुलांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. यासाठी CCTV पाहिले, नातेवाईकांना संपर्क केला. CCTV मध्ये पुण्यातील दक्षिणमुखी मारुतीच्या जवळील बसस्टॉपवर बसलेल्या दिसल्या. तिथून पुढचा शोध काही लागेना. आजींचे वय ८२ वर्ष असून त्यांची तब्येत ही वयोमानानुसार व्यवस्थित होती. तसेच घरातही कोणत्याही प्रकारचे वाद अथवा क्लेशदायक घटना त्यांच्याबाबतीत घडली नव्हती.
असे असल्यामुळे आजींच्या बाबतीत काय झाले असू शकते? आजी कुठे गेल्या असतील? अशा विचाराने त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांनी पोलिसांमध्ये देखील आई हरवल्याची तक्रार दाखल केली होती. अनेक मित्र, नातेवाईक सर्वजण त्यांना शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. या सगळ्या प्रवासामध्ये पोलिसांबरोबरच अन्य इतर मार्गांचा देखील आजींना शोधण्यासाठी जसे की ज्योतिषशास्त्राचाही आधार घेण्याचे ठरविले. हाच विषय घेऊन श्रीयुत जोशी माझ्याकडे आले होते. आजींच्या जन्मतारखेनुसार कुंडली नव्हती. हरविलेल्या व्यक्ती किंवा अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी प्रश्नकुंडलीच्या आधारेच प्रश्न सोडवितो.

ही कुंडली कृष्णमूर्ती पद्धतीने पाहायचे असे ठरविले.
आजी कधी सापडणार या प्रश्नासाठी ११ चा उपनक्षत्र स्वामी कोण आहे, आणि तो ११ किंवा १ चा किंवा प्रश्नकर्ता मुलगा असल्यामुळे पंचमाचा कार्येश आहे का हे प्रथमत: पाहिले .(११ वे स्थान हे इच्छापूर्ती दाखविते. १ स्थान हा प्रश्नकर्ता स्वतः दर्शवितो. येथे प्रश्नकर्ता माहिती असल्यामुळे पंचम स्थानाचा देखील विचार करण्याचा ठरविले.
* ११ चा उप. न. स्वा. रवी (११ वा भाव)
रवी चा न. स्वा. केतू (११ वा भाव) (केतूचा न .स्वा. केतू)
रवी चा उप. न. स्वा. राहू (५ वा भाव) (राहूचा न.स्वा. मंगळ भाव ९,२, ७ )
११ चा उप. न. स्वा. याने नक्षत्र आणि उपनक्षत्रामध्ये ११, २, ५ असे महत्त्वाचे भाव दाखविले आहेत. (भाव २ म्हणजे कुटुंब). तसेच रवी विरोधी भाव दर्शवित नाही. यामुळे आजी सापडतील असे निदर्शनास आले.
तसेच रवी हा कार्येश भावामध्ये ११ चा बलवान कार्येश ग्रह आहे. यामुळे आजी सापडतील या निर्णयाला दुजोरा मिळाला.
आजी मिळणार हे लक्षात आल्यावर अर्थातच पुढचे प्रश्न विचारले गेले. कुठे असतील? कशा स्थितीत असतील? केव्हा सापडतील? कोणत्या दिशेला असतील? असे काही सांगता येईल का?
अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या प्रश्नकुंडलीच्या आधारे सोडविण्याचा प्रयत्न केला. हरवलेली व्यक्ती/वस्तू कुठे पाहण्यासाठी सप्तम स्थानाचा विचार केला जातो. माझ्या अनुभवांनुसार कृष्णपद्धतीनुसार त्या व्यक्तीचा मागोवा घेणे या पेक्षा मला वैदिक पद्धतीनुसार या प्रश्नांचा मागोवा घेणे योग्य वाटते. म्हणून मी प्रश्न कुंडलीतील सप्तम स्थानाचा विचार करायचे ठरविले.
प्र. कुंडलीत सप्तमात मेष राशी असून कोणताही ग्रह नाही. त्यामुळे सप्तमेश मंगळ हा नवम स्थानि मिथुन राशीत आहे. मिथुन राशी ही द्विस्वभाव राशी असून प्रवास दर्शविणारी राशी आहे. नवम स्थान हे परराज्य दर्शविते. कुंडलीत मिथुन रास नैऋत्य दिशेला असली तरी दक्षिण दिशा म्हणून विचार करायला हरकत नाही. मंगळाचा न. स्वा. राहू हा पंचम स्थानी कुंभ राशीत आहे. कुंभ रास म्हणजे एक हंडा म्हणजेच एखादे बंदिस्त किंवा बांधलेले ठिकाण. नैसर्गिक कुंडलीने कुंभ राशी ही आग्नेय/दक्षिण दिशा दर्शविते.
पंचम स्थान आणि नवम स्थान हे धार्मिक ठिकाण, उपासना केंद्र, आश्रम इ. दर्शविते. यामुळे आजी दक्षिण दिशेला देवालय, धर्मक्षेत्र, आश्रम येथे असव्यात असे सांगितले.
दशाविचार:
प्रश्नसमयीची दशा – शुक्र / गुरु / मंगळ / शुक्र / शनि
महादशा शुक्र – हा LSRD मध्ये आहे. (कार्येश भाव १/८/१२/३ )
अंतर्दशा गुरु – हा देखील LSRD मध्ये आहे. (का. भाव २/४/६/१२/३/९)
विदशा मंगळ – हा LSRD मध्ये आहे. (का. भाव २/४/१२/३/९)
प्राणदशा शुक्र – हा LSRD मध्ये आहे. (का. भाव १/८/१२/३)
सूक्ष्मदशा ही ३१/८/२०२६ पहाटे ३ वाजून ४२ मिं.पर्यंत होती. याच्यापुढील प्राणदशा रवी हा LSRD मध्ये नाही. तसेच LSRD मध्ये शनि नसल्यामुळे आणि प्र. कुंडलीतील लग्न हे चर राशीतील तूळ असल्यामुळे लवकरच घटना घडेल या निष्कर्षापर्यंत पोहोचले होते.
दि. २४ तारखे नंतर मंगळ ही सूक्ष्म दशा होती. त्याच्यानंतर राहूची सूक्ष्मदशा होती. राहू LSRD त नाही .
नंतर गुरु ही सूक्ष्मदशा होती. मंगळ, गुरु दोन्ही झाल्या नंतर शनि ची सूक्ष्मदशा २७ /१२/२०२६ ते २९/१/२०२६पर्यंत होती. शनि हा ४ चा एकमेव कार्येश असून तो ६/१२/३/९/५ यांचा कार्येश होता. चंद्रभ्रमणा चा विचार करता प्रश्नवेळी चंद्र तृतीयेत होता. तो केंद्रात मकर राशीत आला की आजी सापडतील असे साधारणतः घडते परंतु मुलांनी प्रश्न विचारल्यामुळे मुळे म्हणजेच कुंभ राशीत चंद्र जाईल तेव्हा आईच्या बद्दलची माहिती मिळेल / शोध लागेल असे वाटले. अर्थातच २८ /०८ /२०२६ रोजी श्रीयुत जोशी यांच्या सांगण्यानुसार दु. १२ /
१२ :३० च्या सुमारास त्यांची आई कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथील आश्रमात आहे असे समजले. त्यांनी शहानिशा करून त्यांची आई असल्याचीच खात्री पटली. कुटुंबीय गाणगापूर ला जाऊन प्रत्यक्ष आईला भेटले. आई सुखरूप असल्याचे पाहून सगळ्यांनाच आनंद झाला. जेव्हा श्री. जोशी माझ्याकडे आले होते तेव्हा प्रश्नकुंडली वरून मी काही प्रश्न त्यांना विचारले. त्यातील पहिला प्रश्न होता की, त्यांचे हिमोग्लोबिन आणि आयोडीन कमी झाले आहे का? ह्याला काही विशेष नियम नाही. परंतु मला एकंदरीत ग्रहस्थिती वरून असे वाटले आणि त्यास त्यांनी दुजोरा दिला. मी जो विचार केला तो इथे मांडत आहे. प्र. कुंडलीनुसार चंद्राची स्थिती पाहिली त्यावर शनीची दहावी दृष्टी होती आणि
मंगळाची सातवी दृष्टी आहे असे निदर्शनास आले. यावरून हिमोग्लोबिन कमी असेल असा अंदाज बांधला . रवीचा ही विचार केला. रवी हा ताकद/ऊर्जेचा कारक असल्याने रवी बद्दल विचार करताना असे निदर्शनास आले की रवी, बुध, केतू युतीत आहेत. आयोडीनची कमतरता असावी असा एक अंदाज बांधला गेला आणि आपण तो यावेळेला अचूक लागला. अशा प्रकारे हरवलेल्या व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेचा अंदाज बांधता येऊ शकतो हे निदर्शनास आले. आजी सापडल्यामुळे आणि त्यांच्या कुटुंबियांचा आनंद पाहून आनंद झाला.
टीप : प्र. कुंडलीत मी माझ्या पद्धतीने सोडविली आहे. अनेक जण आपापल्या अनुभवानुसार वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न सोडवत असतात .
मी कृष्णमूर्ति पद्धत, वेदिक पद्धत याचा एकत्रित विचार करते आणि ते दरवेळेला योग्य उत्तर देते असे निदर्शनास आले आहे.
-ज्योतिषशास्त्री आभा करंदीकर
